सेनेच्या राजकीय चाणक्यांनी दिले आघाडीचे धड

Foto
औरंगाबाद :  शिवसेनेचे राजकीय चाणक्य आणि महाविकास आघाडीचे शिल्पकार खा. संजय राऊत दोन दिवस शहरात होते. या मुक्‍कामात त्यांनी शिवसेनेसह काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत गुप्तगू केली.  यावेळी त्यांनी राज्यातील लोकशाही आघाडीच्या प्रयोगाचे सूत्र स्थानिक नेत्यांच्या गळी उतरविल्याचे बोलले जाते.
राज्यात शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत हात मिळवणी केल्यानंतर खा. संजय राऊत प्रकाशझोतात आले. राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांसह काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, महासचिव अहमद पटेल यांच्यासोबत झालेल्या वार्तालापात राऊत यांची प्रमुख भूमिका होती. एकीकडे भाजपवर टीकेचे बाण सोडत दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना आघाडीसाठी राजी करण्याचे मोठे राजकीय कौशल्य राऊत यांनी पणाला लावले होते. त्यामुळेच त्यांना शिवसेनेचे राजकीय चाणक्यही म्हटले जाते. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खा. राऊत यांचा दोन दिवसांचा दौरा महत्त्वाचा ठरतो. वृत्तपत्राच्या कार्यक्रमानिमित्त राऊत जरी शहरात आले असले तरी त्यांनी दोन दिवस महत्त्वाच्या नेत्यांसोबत चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे राऊत यांच्या आगमनापूर्वीच खैरे यांचे नाराजी नाट्य घडले होते. त्याचबरोबर शिवसेनेतील गटबाजीही उघड चव्हाट्यावर आली होती. राऊत यांनी शिवसेना नेते खैरे यांची समजूतही घातली. त्याचबरोबर महानगरपालिकेतील लोकशाही आघाडीचे स्वरूप कसे असेल याबाबतही स्थानिक नेत्यांशी चर्चा केली.
जुन्या शिवसैनिकांशी संवाद
दरम्यान शहरातील जुन्या नाराज शिवसैनिकांशीही  राऊत यांनी संवाद साधल्याचे बोलले जाते. तसेच भाजपकडून शिवसेनेत प्रवेशासाठी इच्छुक असलेल्यांचीही राऊत यांची भेट घेतल्याचे समजते. हा दौरा राजकीय नसल्याचे स्थानिक पदाधिकार्‍यांकडून सांगण्यात येत आहे. 

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker